त्वचा उजळ असेल तर त्वचेचा कोणताही रंग सुंदर दिसतो. ठाऊक होतं का तुम्हाला?

गोरा रंग म्हणजे सौंदर्य हा समज भारतीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बिंबवण्यात आला आहे. पूर्वीपासून, एखादी मुलगी कितीही देखणी असली, तरी गहूवर्णामुळे ती गोऱ्या मुलींच्या तोडीची समजली जात नव्हती आणि सावळा किंवा काळा रंग हा तर कलंकासारखा बघितला जात होता. भारतीयांच्या त्वचेचा वर्ण गोरापान ते अगदी सावळा किंवा गडद सावळा अशा सर्व छटांमध्ये आढळतो. तरीही गौरवर्णीयांकडे श्रेष्ठ म्हणून बघितले जात होते. आता ही परिस्थिती नाही. आज, सावळा रंग हा काळ्या किंवा गोऱ्या रंगाइतकाच सुंदर समजला जातो. बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल्स त्यांचा सावळा रंग अभिमानाने मिरवतात.

मात्र, वर्णाला उजळ त्वचेची जोड असेल तरच त्याबाबत अभिमान बाळगणे शक्य होते. बिपाशा बसू, दीपिका पदुकोण किंवा लारा दत्ता यांची नावे घेतली की या अभिनेत्री व मॉडेलच्या रंगाऐवजी त्यांची नितळ त्वचा तुमच्या डोळ्यासमोर येते.
त्यांना हे कशामुळे साध्य होते? तुमची त्वचाही त्यांच्यासारखीच सुंदर होण्यासाठी काही साधे उपाय आहेत. या उपायांमुळे तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असो ती सुंदर दिसेल.

सौंदर्य त्वचेच्या आतून खुलते

तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार दिसायला हवी असेल, तर तिचे आतून पोषण करणे आवश्यक आहे. यासाठी पुरेसे पाणी आणि योग्य आहार आवश्यक असतो. दररोज ६ ते ८ ग्लास पाणी प्यायलात तर तुमच्या शरीरातील विषारी घटक त्वरित बाहेर टाकले जातील. ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्सयुक्त आहार घेतल्यास त्वचेवर निरोगी चमक येते. मासे आणि अक्रोड यांच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स असतात. क जीवनसत्वाने युक्त असलेल्या अन्नपदार्थांमुळे मुरमे (पिंपल्स) लवकर नाहीशी होतात. ताज्या भाज्यांसारख्या तंतूमय पदार्थांमुळे तुमच्या पचनसंस्थेचे नियमन होते आणि याचे प्रतिबिंब तुमच्या निरोगी त्वचेतही दिसते.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, मिठाच्या अतिसेवनाने तुमचा चेहरा सुजल्यासारखा दिसू शकतो आणि साखर अतिरिक्त प्रमाणात घेतल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसते. तेव्हा, पॅकेज्ड जंक फूडचे सेवन मर्यादेत ठेवा!

थोडे अधिक प्रयत्न करा

चांगल्या व्यायामामुळे तुमच्या त्वचेवर जी निरोगी झळाळी येते, ती अन्य कशानेही येत नाही. चांगले कार्डिओ व्यायाम, दररोज धावायला जाणे किंवा अगदी नियमित चालण्याच्या व्यायामामुळेही रक्ताभिसरणाला चालना मिळते. याचा परिणाम म्हणून त्वचा चमकदार दिसते.

रात्रीची आठ तासांची आवश्यक झोप मिळेल याची खात्री करा. तुमची जीवनशैली तणावपूर्ण असेल तर त्वचा निस्तेज होते. तेव्हा तुमच्या पेशी शिथिल करण्यासाठी योगासने किंवा ध्यान करा.

नेहमी तुमचा सर्वोत्तम चेहरा जगासमोर आणा

उत्तम त्वचेसाठी केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे पुरेसे नाही. त्वचेची बाहेरून काळजी घेण्याची गरजही भासतेच.

सौम्य साबणाचा वापर करून नियमितपणे चेहरा धुणे, रात्री सर्व मेक-अप स्वच्छ करणे, अपरिहार्य हानीपासून चेहऱ्याच्या नाजूक त्वचेचे संरक्षण करण्यासाठी मॉइश्चरायझर्स आणि सनस्क्रीन्स लावणे अशा प्रकारची बाह्यकाळजी घेणेही आवश्यक असते.

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक घटक म्हणजेच चंदन, हळद तसेच कुमकुमादी तैलम, असलेल्या उत्पादनांचा वापर करा.

याहून अधिक सोपा उपाय म्हणजे अलोव्हेरा (कोरफड) जेलचा वापर करा. त्यामुळे तुमची त्वचा झळाळून उठेल. अॅलोव्हेराचा अंतर्भाव असलेले जेल्स प्रदूषणालाही प्रतिबंध करतात तसेच दीर्घकाळ परिणामकारक ठरतात. त्यामुळे दररोज ९ ते ५ या कालावधीत धूळ आणि मळ यांचा सामना करणाऱ्यांसाठीही ते उपयुक्त ठरतात.

तुमच्या जीवनशैलीमध्ये आणि सवयींमध्ये काही छोटे बदल केल्यास तुमच्या आतील झळाळी बाहेर येऊ शकते, मग तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असो!